Showing posts with label Doctor. Show all posts
Showing posts with label Doctor. Show all posts

Sunday, April 12, 2020

देशाचं हित कुणाच्या हातात?

देशाचं हित कुणाच्या हातात?

मागील काही दिवसांपासून राज्यसह संपूर्ण देश लॉकडाऊन मध्ये आहे. कोविड १९ कोरोना या विषाणूनमुळे राज्य, देशच नव्हे तर संपूर्ण जग बंद पडलं आहे. चीनच्या वुहान मधून सर्वदूर पसरलेल्या या व्हायरस ने मोठ्या शहरांसोबत छोट्या छोट्या खेड्यांत देखील शिरकाव केला आहे. या विषाणूसाठी अजून लस उपलब्ध नसली तरी आपण काही नियम पाळून त्याला रोखू शकतो, पण नियम कुणासाठी??

               वुहान जे की कोरोना व्हायरसचं केंद्रबिंदू होतं, तिथून हा व्हायरस गेला आणि ७६ दिवसांनी तेथील लॉकडाऊन हटवण्यात आलं. तेथील जनतेने पाळलेल्या कडक नियम आणि शिस्त यामुळेच ते यातून पार पडलेत. युरोपियन देश आणि अमेरिका सध्या ज्या स्थितीत आहेत त्या परिस्थिती पासून भारत लांब असला तरी काही लोकं नियम धाब्यावर बसवून गर्दी करताना दिसतच आहेत. 
               केंद्र सरकार आणि राज्य सरकारने प्रशासनाला सोबत घेऊन या विषाणू विरुद्ध लढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. डॉक्टर्स, पोलीस आणि अत्यावश्यक सेवा पुरवणारे सारेच आपल्या जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. पण सरकारने सांगितल्याप्रमाणे "सोशल डिस्टन्स" मात्र काही लोकं पाळताना दिसत नाहीत. 
               देश संकटात असताना देशाचे नागरिक या नात्याने आपले पण काही कर्तव्य आहेत ज्याला आपण तयार राहील पाहिजे, पण काही ना काही कारणं काढून लोकं गर्दी करतच आहेत. संचारबंदी असतानाही स्वतःला सुशिक्षित समजणारे देखील सकाळी मॉर्निंग वॉक ला जात आहेत, या मध्ये तरुणांच्या बरोबरीने या विषाणूच्या घातक पातळीवर असणाऱ्या वयोगटातील म्हणजेच वृद्ध व्यक्तिंचाही समावेश पाहायला मिळतो.
               सुट्या मिळाल्या आहेत म्हणून घरी न थांबता काहीजण पार्ट्या करण्यात गुंग आहेत. ग्रुप करून पोहायला जाणे, काट्यावर जमून गप्पा मारणे, गावातून बिनकामाचा फेरफटका मारणे असे प्रकार देखील दिसत आहेत. देशसेवेसाठी कधीही तयार असं म्हणणारे मात्र प्रत्यक्षात उलट वागताना दिसत आहेत. त्यांचं देशप्रेम कमी आहे अशातला भाग नाही पण त्यांना या विषाणूंची भीतीच राहिलेली नाही. 'मला नाही होणार' असं त्यांना वाटतं असलं तरी 'माझ्यामुळे कोणाला व्हायला नको' ही भावना निर्माण होणं गरजेचं आहे. 
               काही ठिकाणी दोन तीन दिवस १००% लॉकडाऊन केल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी यात्रेप्रमाणे गर्दी होताना दिसत आहे. मुंबई सारख्या रेड झोन मध्ये असणाऱ्या ठिकाणी सुद्धा भाजीपाला, मासे घेण्यासाठी लोकांची गर्दी बघून परिस्थिती अजून किती भयानक होऊ शकते हे समजू शकते. धारावी सारख्या गर्दीच्या ठिकाणी या रोगाचे खूप रुग्ण आढळून येत आहेत. तसेच वरळी मध्ये देखील रुग्णांची संख्या जास्त आहे. पण तरी देखील मुंबई मधील गर्दी "स्पिरिट ऑफ मुंबई" च्या नावाखाली जमतच आहे. हे भयानक आहे. २०१९ ला कोल्हापूर, सांगली ,सातारा जिल्ह्यातील महापुरावेळी परिस्थिती खूप वाईट होती. त्यावेळी लाईट नव्हती, दूध, छोटे दवाखाने,भाजीपाला मार्केट सर्व बंद होतं. मोठ्या शहराचा संपर्क तुटला होता तरीही लोकांनी धीर सोडला नाही. सर्वजण प्रशासनाला साथ देत होते.
               सर्व जबाबदारी प्रशासनावर आणि सरकारवर टाकून नाही चालणार, आपण देखील आपली जबाबदारी उचलायलाच हवी नाही तर आपली परिस्थितीसुद्धा युरोपीयन देशांसारखी व्हायला वेळ लागणार नाही. घरातील एखादी व्यक्ती अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर जात असेल तर त्याची योग्य ती खबरदारी त्या व्यक्तींबरोबरच घरच्यांनी देखील घ्यायला हवी. किराणा, भाजीपाला आणि औषध आणण्यासाठी घरातील एकाच व्यक्तीला पाठवाव आणि समान धुवुनच आत घ्यावं. घरातील एखादी व्यक्ती ऐकत नसेल तर त्यांना परिस्थिती नीट समजावून सांगा. 
               शासनाने सांगितलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे आणि जो कोणी करत नसेल त्यालाही नियमांचे पालन करण्यास सांगावे, काही लोकांच्यामुळे नियम पाळणाऱ्या व्यक्तींनाही याचा त्रास होऊ शकतो. येत्या काही दिवसांत कोरोनाला आपण हारवूच पण त्यासाठी आपला खारीचा वाटा असणं तितकंच महत्वाचं आहे. देशासाठी आणि आपल्या भविष्यासाठी घरीच थांबुया आणि देशसेवा करूया....

: - स्व,
१२ एप्रिल,२०२०
कोल्हापूर

Monday, March 30, 2020

३० मार्च, राष्ट्रीय डॉक्टर्स डे Doctors Day

३० मार्च, राष्ट्रीय डॉक्टर्स डे

आज ३० मार्च, जागतिक डॉक्टर्स डे निमित्त सर्व डॉक्टर्स ना खूप शुभेच्छा.
समाजातील एक असा घटक ज्याची गरज आज खाऱ्या अर्थाने संपूर्ण जगाला पटली आहे. डॉक्टर म्हणजे देव असं आपण आधी मानतो. जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत विविध ठिकाणी आपला आणि डॉक्टर्स यांचा संबंध येत असतोच.

माणूस खुश असेल तर त्याला दगडात सुद्धा देव दिसतो आणि तोच जर दुःखी झाला तर देवालाच नावं ठेवतो, अगदी तसच काही डॉक्टरांच्या बाबतीत देखील घडतं. पेशंट ठणठणीत झाला तर डॉक्टर म्हणजे परमेश्वर आणि चुकून दगावला तर हेच डॉक्टर पेशंटच्या नातेवाईकांसाठी राक्षस किंवा पैसे खाणार देखील होऊन जातो. प्रसंगी डॉक्टर्स,नर्स, स्टाफ यांच्यावर हात देखील उगारला जातो. गरज आहे ती दृष्टीकोण बदलण्याची.

इमेज सौर्स  www.oneindia.com

खेडोपाड्यात आजही कितीतरी माणसं वेळेवर उपचार न मिळाल्याने दगावतात, कितीतरी स्रियांची प्रसूती योग्य प्रकारे होत नाही, कितीतरी लहानं मुले जन्मतः अपंगत्व घेऊन जन्माला येतात. याला डॉक्टर जबाबदार नाहीत, अपुऱ्या सोई सुविधा, औषधे आणि लोकांमध्ये न झालेली जनजागृती जबाबदार आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या रूपाने खेडोपाड्यात दवाखाना , डॉक्टर्स पोहचले पण त्यांना हव्या त्या सुविधांचा अजूनही अभाव आहे. घरापासून लांब, स्वतःच्या परिवारापासून लांब राहून डॉक्टर्स सुविधा पुरवत आहेत.

भारत आज विकसनशील देशांमध्ये देखील पुढं आहे. पण तरीही आरोग्याविषयक असणारं बजेट हे कमीच आहे. आज जगाला नोवेल कोरोना व्हायरस ने भंडावून सोडलं आहे. त्यामुळेच भारतातील आरोग्यसेवेचा प्रश्न पुन्हा वर आला आहे. भारत भविष्यात आरोग्यसेवेमध्ये देखील अग्रेसर होईल अशी आशा आहे.


विजय बाबासाहेब गुरव
३० मार्च,२०२०
कोल्हापूर

काही तरी बोल ना

 काही तरी बोल ना दिवसेंदिवस तुझा हा दुरावा कधी येऊन संपावशील? प्रेमाचे चार शब्द एकवूनी पुन्हा मला आपलंसं करशील तयारच आहेत कान माझे मन ही आतु...