रुळावरचं मरण,
कोरोना व्हायरस मुळे जवळ जवळ दीड महिन्यांपासून मजूर राज्यातील विविध ठिकाणी अडकलेत. शुक्रवार दिनांक 7 मे ला रात्री औरंगाबाद येथील काही कामगार रेल्वे पकडण्यासाठी गावाकडे निघाले होते.
मात्र, यातील १६ कामगार पहाटे मालगाडी खाली आल्यानं त्यांचा दुर्दैवी मत्यू झाला...
Source Facebook |
रुळावरचं मरण
मोलमजुरीचं जगणं आमचं
काय असणार स्वप्नं आमची?
दिवसागणिक भाकर तुकडा
ही एकच आशा जगण्याची..
ना पाहिलं भविष्य ना चिंता
त्या उद्या येणाऱ्या दिवसाची.
आजच मरण उद्यावर ढकलत
घेऊन जगलो ढाल कष्टाची.
काम थांबलं रोजगार बुडाला
पोटाची खळगी भरणार कशी?
गाव झाले बंद रस्ते रेल्वे बंद
धरली घरची वाट मिळेलतशी.
करत पायपीट धुरळा तुडवीत
पडलो बाहेर मुठीत घेऊन जीव,
पहाटेच्या अंधारात आला काळ
निसर्गालासुद्धा आली असेल कीव.
रुळावर विखरलो छिन्नविच्छिन्न
सोबत भाकऱ्या अन घामाचं तूप,
मातीतलीच अहो माणसं आम्ही
त्या मातीशीच झालो एकरूप.
रक्ताच्या थारोळ्यात पडलो
शब्द सुद्धा नाही फुटला.
मदत मागायला अन जगायला
एकही अवयव नाही उरला.
मदत मागायला अन जगायला
एकही अवयव नाही उरला...Vj
:- स्व,
०९ मे, २०२०
कोल्हापूर.
No comments:
Post a Comment