मनामध्ये वादळ आणून
काही क्षण मना मध्ये असं घर करून जातात कि त्या कधी कधी कवितांच्या स्वरूपात व्यक्त होतात. अशाच काही क्षणांचे आणि आठवणींचे कवितेतून मांडलेली सफर
Saturday, April 18, 2020
Sunday, April 12, 2020
देशाचं हित कुणाच्या हातात?
देशाचं हित कुणाच्या हातात?
मागील काही दिवसांपासून राज्यसह संपूर्ण देश लॉकडाऊन मध्ये आहे. कोविड १९ कोरोना या विषाणूनमुळे राज्य, देशच नव्हे तर संपूर्ण जग बंद पडलं आहे. चीनच्या वुहान मधून सर्वदूर पसरलेल्या या व्हायरस ने मोठ्या शहरांसोबत छोट्या छोट्या खेड्यांत देखील शिरकाव केला आहे. या विषाणूसाठी अजून लस उपलब्ध नसली तरी आपण काही नियम पाळून त्याला रोखू शकतो, पण नियम कुणासाठी??
वुहान जे की कोरोना व्हायरसचं केंद्रबिंदू होतं, तिथून हा व्हायरस गेला आणि ७६ दिवसांनी तेथील लॉकडाऊन हटवण्यात आलं. तेथील जनतेने पाळलेल्या कडक नियम आणि शिस्त यामुळेच ते यातून पार पडलेत. युरोपियन देश आणि अमेरिका सध्या ज्या स्थितीत आहेत त्या परिस्थिती पासून भारत लांब असला तरी काही लोकं नियम धाब्यावर बसवून गर्दी करताना दिसतच आहेत.
केंद्र सरकार आणि राज्य सरकारने प्रशासनाला सोबत घेऊन या विषाणू विरुद्ध लढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. डॉक्टर्स, पोलीस आणि अत्यावश्यक सेवा पुरवणारे सारेच आपल्या जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. पण सरकारने सांगितल्याप्रमाणे "सोशल डिस्टन्स" मात्र काही लोकं पाळताना दिसत नाहीत.
देश संकटात असताना देशाचे नागरिक या नात्याने आपले पण काही कर्तव्य आहेत ज्याला आपण तयार राहील पाहिजे, पण काही ना काही कारणं काढून लोकं गर्दी करतच आहेत. संचारबंदी असतानाही स्वतःला सुशिक्षित समजणारे देखील सकाळी मॉर्निंग वॉक ला जात आहेत, या मध्ये तरुणांच्या बरोबरीने या विषाणूच्या घातक पातळीवर असणाऱ्या वयोगटातील म्हणजेच वृद्ध व्यक्तिंचाही समावेश पाहायला मिळतो.
सुट्या मिळाल्या आहेत म्हणून घरी न थांबता काहीजण पार्ट्या करण्यात गुंग आहेत. ग्रुप करून पोहायला जाणे, काट्यावर जमून गप्पा मारणे, गावातून बिनकामाचा फेरफटका मारणे असे प्रकार देखील दिसत आहेत. देशसेवेसाठी कधीही तयार असं म्हणणारे मात्र प्रत्यक्षात उलट वागताना दिसत आहेत. त्यांचं देशप्रेम कमी आहे अशातला भाग नाही पण त्यांना या विषाणूंची भीतीच राहिलेली नाही. 'मला नाही होणार' असं त्यांना वाटतं असलं तरी 'माझ्यामुळे कोणाला व्हायला नको' ही भावना निर्माण होणं गरजेचं आहे.
काही ठिकाणी दोन तीन दिवस १००% लॉकडाऊन केल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी यात्रेप्रमाणे गर्दी होताना दिसत आहे. मुंबई सारख्या रेड झोन मध्ये असणाऱ्या ठिकाणी सुद्धा भाजीपाला, मासे घेण्यासाठी लोकांची गर्दी बघून परिस्थिती अजून किती भयानक होऊ शकते हे समजू शकते. धारावी सारख्या गर्दीच्या ठिकाणी या रोगाचे खूप रुग्ण आढळून येत आहेत. तसेच वरळी मध्ये देखील रुग्णांची संख्या जास्त आहे. पण तरी देखील मुंबई मधील गर्दी "स्पिरिट ऑफ मुंबई" च्या नावाखाली जमतच आहे. हे भयानक आहे. २०१९ ला कोल्हापूर, सांगली ,सातारा जिल्ह्यातील महापुरावेळी परिस्थिती खूप वाईट होती. त्यावेळी लाईट नव्हती, दूध, छोटे दवाखाने,भाजीपाला मार्केट सर्व बंद होतं. मोठ्या शहराचा संपर्क तुटला होता तरीही लोकांनी धीर सोडला नाही. सर्वजण प्रशासनाला साथ देत होते.
सर्व जबाबदारी प्रशासनावर आणि सरकारवर टाकून नाही चालणार, आपण देखील आपली जबाबदारी उचलायलाच हवी नाही तर आपली परिस्थितीसुद्धा युरोपीयन देशांसारखी व्हायला वेळ लागणार नाही. घरातील एखादी व्यक्ती अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर जात असेल तर त्याची योग्य ती खबरदारी त्या व्यक्तींबरोबरच घरच्यांनी देखील घ्यायला हवी. किराणा, भाजीपाला आणि औषध आणण्यासाठी घरातील एकाच व्यक्तीला पाठवाव आणि समान धुवुनच आत घ्यावं. घरातील एखादी व्यक्ती ऐकत नसेल तर त्यांना परिस्थिती नीट समजावून सांगा.
शासनाने सांगितलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे आणि जो कोणी करत नसेल त्यालाही नियमांचे पालन करण्यास सांगावे, काही लोकांच्यामुळे नियम पाळणाऱ्या व्यक्तींनाही याचा त्रास होऊ शकतो. येत्या काही दिवसांत कोरोनाला आपण हारवूच पण त्यासाठी आपला खारीचा वाटा असणं तितकंच महत्वाचं आहे. देशासाठी आणि आपल्या भविष्यासाठी घरीच थांबुया आणि देशसेवा करूया....
: - स्व,
१२ एप्रिल,२०२०
कोल्हापूर
Friday, April 10, 2020
वसुंधरेसाठी.....
वसुंधरेसाठी
निसर्गाची सोडून साथ,
त्यालाच आम्ही दम देतोय.
करेल किती सहन तो ही,
आपले अस्तित्व दाखवून देतोय..
![]() |
| Image Source : Facebook |
केली कत्तल बेसुमार या,
आम्हालाच पोसणाऱ्या झाडांची.
हवे नवे बंगले अन सुविधा,
हौस आम्हाला गाड्यांची..
मुजवून टाकू समुद्रसुद्धा
टाकुनी भर खडकांची,
वाटेल भीती त्यालासुद्धा
भल्या मोठ्या या दगडांची..
प्रदूषणावर बोलावे काय
त्याचीही आता हद्द झाली,
फुकट मिळणारी हवा आता
पैसे देऊन मिळू लागली..
माणसाला कधी समजणार
चूक त्याच्या स्वार्थाची,
समतोल सारा बिघडवू लागलो
बाजू घेऊन व्यर्थाची..
निसर्ग तरी बसेल का शांत
तोच त्याचे उत्तर देईल,
सहनशक्ती च्या उद्रेकावर
सर्वांनाच निसर्गात सामावून घेईल..
चला, आता पुढे येवुया
घेऊनी शपथ पृथ्वीची,
पापं फेडूनी करू तयारी
वसुंधरेला वाचवायची..
पापं फेडूनी करू तयारी
वसुंधरेला वाचवायची...Vj
:- स्व,
१० एप्रिल, २०२०
कोल्हापूर
Saturday, April 4, 2020
माणसातील माणूस शोधतोय
माणसातील माणूस शोधतोय
धकाधकीच्या जीवनातून या
कुटुंबात मी रमतोय,
आमच्यासाठी राबणाऱ्या त्या
माणसातील माणूस शोधतोय..
विषाणूंचा विळखा जगाला
मनुष्य गुदमरून मरतोय,
कधी नव्हे ते प्राणिमात्रा
स्वतंत्र आयुष्य जगतोय..
आम्ही केली पापं
तेच भोग भोगतोय,
देऊळ बंद झालीत तरी
डॉक्टरांमध्ये देव बघतोय..
दिवसरात्र बंद सारे
तरी निर्धास्त राहतोय,
यंत्रणासारी सज्ज करून
पोलिस रात्रंदिवस जागतोय..
थांबलं असलं जग
शेतकरी कुठं थांबतोय,
पोटं आपली भरण्यासाठी
तो उपाशीच राबतोय.
किती कौतुक करावे
अश्यांचे देशप्रेम अनुभवतोय,
जीवावर उधार होणाऱ्या त्या
माणसातील माणूस शोधतोय..
जीवावर उधार होणाऱ्या त्या
माणसातील माणूस शोधतोय...Vj
स्व.
०४ एप्रिल, २०२०
कोल्हापूर
Thursday, April 2, 2020
सोबतीचा हात
.
सोबत चालताना तुझ्या
मन हे फुलुन जाईल,
हात हातातले ते
तिरकी नजर पाहिल..
बोलावे किती अन
जाणून काय घ्यावे,
तुझं ऐकता ऐकता
तुझा होऊन पहावे..
न संपो कधी ही वाट
वाटेवरी चालताना,
गर्दीतल्या स्पर्शापेक्षा
नव्याने स्पर्श झेलताना..
तिमिरात ही पडावा
उजेड हा जीवांचा,
राहो अखंड ऐसें
हात हातात सोबतीचा..
राहो अखंड ऐसें
हात हातात सोबतीचा...Vj
:-स्व
०१ एप्रिल,२०२०
कोल्हापूर
Tuesday, March 31, 2020
दिलासादायक: ओझोनचे छिद्र भरण्यास सुरुवात
'मॉन्ट्रियल कराराचा इफेक्ट'
अंटार्क्टिका वरील ओझोन छिद्र नैसर्गिकरित्या भरून येत आहे, त्यामुळे दक्षिण गोलार्धातील वातावरणात होणारे अनेक चिंताजनक बदल प्रत्यक्षात थांबण्यास मदत होईल. कोरोनामुळे जगभरात भीतीचे वातावरण असले तरी ही एक दिलासा दायक अशीच बातमी आहे.
गेल्या काही दशकात मानवी कृत्यांमुळे ओझोन चे संतुलन बिघडत चालले होते, १९८७ चा माँट्रियल करार व १९८९ च्या लंडन परिषदेमुळे ओझोन अवक्षयाचे गांभीर्य लोकांच्या लक्षात आले आहे. अनेक राष्ट्रांबरोबरच भारत ओझोन समस्येबाबत जागृत व जबाबदार राष्ट्र आहे.
स्थितांबरात असणार्या ओझोनामुळे सूर्याकडून येणार्या अतिनील किरणांचा काही भाग शोषला जातो आणि सजीवांना पोषक एवढीच उष्णता भूपृष्ठावर येते. त्यामुळे अतिनील किरणांपासून सजीव सृष्टीचे संरक्षण होते. अतिनील किरणांमुळे त्वचेचा कर्करोग, डोळ्यांचे विकार इ. अनेक विकार जडतात. स्थितांबरातील या ओझोनाच्या रूपाने पृथ्वीभोवती एक सुरक्षा कवच निर्माण झाले आहे.
तसेच नासाने दिलेल्या माहितीनुसार एकट्या चीन मधील कॉर्बन मोनोक्सीड चे प्रमाण मागील वर्षापेक्षा ३० ते ४०% नी कमी आलं आहे.
![]() |
| Image Source: ladbible.com |
ओझोन म्हणजे काय ?
- ओझोन हा ऑक्सिजनचाच एक प्रकार आहे, त्याचे रासायनिक सूत्र O3 आहे. सजीवांना श्वसनासाठी लागणार ऑक्सिजन म्हणजे O2.
- ओझोन हा आपल्या वातावरणाचा एक भाग आहे, त्याचे अस्तित्व मानवी आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.
- बहुतेक ओझोन वातावरणामध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 10 ते 40 कि.मी. पर्यंत उंचीवर असतो. या प्रदेशास स्तिथांबर म्हणतात.
ओझोन संबंधी अंतरराष्ट्रीय करार:-
- Vienna Convention for the Protection of the Ozone Layer: २२ मार्च १९८५
- The Montreal Protocol on Substances that Deplete the Ozone Layer: १६ सप्टेंबर १९८७
- १५ ऑक्टोबर २०१६ रोजी किगाली (रवांडा) येथे भरलेल्या परीषदेत Montreal Protocol मध्ये दुरूस्ती करण्यात आली.
Monday, March 30, 2020
३० मार्च, राष्ट्रीय डॉक्टर्स डे Doctors Day
३० मार्च, राष्ट्रीय डॉक्टर्स डे
आज ३० मार्च, जागतिक डॉक्टर्स डे निमित्त सर्व डॉक्टर्स ना खूप शुभेच्छा.
समाजातील एक असा घटक ज्याची गरज आज खाऱ्या अर्थाने संपूर्ण जगाला पटली आहे. डॉक्टर म्हणजे देव असं आपण आधी मानतो. जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत विविध ठिकाणी आपला आणि डॉक्टर्स यांचा संबंध येत असतोच.
माणूस खुश असेल तर त्याला दगडात सुद्धा देव दिसतो आणि तोच जर दुःखी झाला तर देवालाच नावं ठेवतो, अगदी तसच काही डॉक्टरांच्या बाबतीत देखील घडतं. पेशंट ठणठणीत झाला तर डॉक्टर म्हणजे परमेश्वर आणि चुकून दगावला तर हेच डॉक्टर पेशंटच्या नातेवाईकांसाठी राक्षस किंवा पैसे खाणार देखील होऊन जातो. प्रसंगी डॉक्टर्स,नर्स, स्टाफ यांच्यावर हात देखील उगारला जातो. गरज आहे ती दृष्टीकोण बदलण्याची.
खेडोपाड्यात आजही कितीतरी माणसं वेळेवर उपचार न मिळाल्याने दगावतात, कितीतरी स्रियांची प्रसूती योग्य प्रकारे होत नाही, कितीतरी लहानं मुले जन्मतः अपंगत्व घेऊन जन्माला येतात. याला डॉक्टर जबाबदार नाहीत, अपुऱ्या सोई सुविधा, औषधे आणि लोकांमध्ये न झालेली जनजागृती जबाबदार आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या रूपाने खेडोपाड्यात दवाखाना , डॉक्टर्स पोहचले पण त्यांना हव्या त्या सुविधांचा अजूनही अभाव आहे. घरापासून लांब, स्वतःच्या परिवारापासून लांब राहून डॉक्टर्स सुविधा पुरवत आहेत.
भारत आज विकसनशील देशांमध्ये देखील पुढं आहे. पण तरीही आरोग्याविषयक असणारं बजेट हे कमीच आहे. आज जगाला नोवेल कोरोना व्हायरस ने भंडावून सोडलं आहे. त्यामुळेच भारतातील आरोग्यसेवेचा प्रश्न पुन्हा वर आला आहे. भारत भविष्यात आरोग्यसेवेमध्ये देखील अग्रेसर होईल अशी आशा आहे.
विजय बाबासाहेब गुरव
३० मार्च,२०२०
कोल्हापूर
आज ३० मार्च, जागतिक डॉक्टर्स डे निमित्त सर्व डॉक्टर्स ना खूप शुभेच्छा.
समाजातील एक असा घटक ज्याची गरज आज खाऱ्या अर्थाने संपूर्ण जगाला पटली आहे. डॉक्टर म्हणजे देव असं आपण आधी मानतो. जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत विविध ठिकाणी आपला आणि डॉक्टर्स यांचा संबंध येत असतोच.
माणूस खुश असेल तर त्याला दगडात सुद्धा देव दिसतो आणि तोच जर दुःखी झाला तर देवालाच नावं ठेवतो, अगदी तसच काही डॉक्टरांच्या बाबतीत देखील घडतं. पेशंट ठणठणीत झाला तर डॉक्टर म्हणजे परमेश्वर आणि चुकून दगावला तर हेच डॉक्टर पेशंटच्या नातेवाईकांसाठी राक्षस किंवा पैसे खाणार देखील होऊन जातो. प्रसंगी डॉक्टर्स,नर्स, स्टाफ यांच्यावर हात देखील उगारला जातो. गरज आहे ती दृष्टीकोण बदलण्याची.
![]() |
| इमेज सौर्स www.oneindia.com |
खेडोपाड्यात आजही कितीतरी माणसं वेळेवर उपचार न मिळाल्याने दगावतात, कितीतरी स्रियांची प्रसूती योग्य प्रकारे होत नाही, कितीतरी लहानं मुले जन्मतः अपंगत्व घेऊन जन्माला येतात. याला डॉक्टर जबाबदार नाहीत, अपुऱ्या सोई सुविधा, औषधे आणि लोकांमध्ये न झालेली जनजागृती जबाबदार आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या रूपाने खेडोपाड्यात दवाखाना , डॉक्टर्स पोहचले पण त्यांना हव्या त्या सुविधांचा अजूनही अभाव आहे. घरापासून लांब, स्वतःच्या परिवारापासून लांब राहून डॉक्टर्स सुविधा पुरवत आहेत.
भारत आज विकसनशील देशांमध्ये देखील पुढं आहे. पण तरीही आरोग्याविषयक असणारं बजेट हे कमीच आहे. आज जगाला नोवेल कोरोना व्हायरस ने भंडावून सोडलं आहे. त्यामुळेच भारतातील आरोग्यसेवेचा प्रश्न पुन्हा वर आला आहे. भारत भविष्यात आरोग्यसेवेमध्ये देखील अग्रेसर होईल अशी आशा आहे.
विजय बाबासाहेब गुरव
३० मार्च,२०२०
कोल्हापूर
Monday, June 3, 2019
बदललेले गाव
बदललेले गाव
बदलले गाव मात्र
ओढ कधी बदलत नाही.
लांब जावे जितके,
तितकीच ओढ वाढत जाई.
एकटा असलो जरी,
भास सारखा होतो राही.
नसतील सोबत तरी,
आवाज आपल्यांच्या ऐकू येई.
क्षणभर राहून दंग,
पुन्हा वर्तमानात वावरायचे की?
सोबतच आहोत म्हणत,
खोलवर स्वप्ने पांघरायचे ती ?
स्वप्नांचे काय हो
कधी दिवसा कधी येतील राती.
स्वप्नांचाही पलीकडे असतील
जपलेली ती जवळची नाती.
ध्येयपूर्तीसाठीचा हा दुरावा
कष्टाने मंतरलेला.
आठवणींच्या जोरावर
नव आव्हाने पांघरलेला.
ध्येयाच्या प्राप्तीसाठी
स्वप्नांची तलवार होईल.
आठवणींना घेऊन सोबत
भासांची हि ढाल होईल.
चांगलं ध्येय ठेवलंय,
आता सारं चांगलंच होईल.
बदललेल्या गावापासून
सगळीकडे नाव होईल.
बदललेल्या गावापासून
सगळीकडे नाव होईल...Vj
:- स्व
२७ मे, २०१९
पुणे.
Wednesday, February 27, 2019
रुसवा तुझा
रुसवा तुझा...
अनेकदा ती मला भेटायला बोलवायची,
'वेळेवर येतच नाहीस' म्हणत रुसून फुगून बसायची.
तिला भेटण्यासाठी मग मीही गडबडीत निघायचो ,
उतरताच गाडी वरून आवरतच पुढे जायचो.
आलो भेटलो तरी ती फक्त एक कटाक्ष टाकायची,
माझा नेहमीचा उशीर बघून रुसून फुगून बसायची.
मी यायचो मीच बोलायचो, ती काहीच नाही बोलायची,
प्रेमाची घेत परीक्षा, मी मनवाव याची प्रतीक्षा करायची.
समोर तीच्या जाऊन बसलो, डोळ्यातसुद्धा नाही पहायची,
'छान! वेळेत आलास' म्हणत आणखीनच चिडून असायची.
मग करायचो कसरत, जगाची मला पर्वाच नसायची.
रुसवा तीचा काढताना खोटी कारणं तरी कितीदा द्यायची,
देत कारणे, उडवत खिल्ली शक्य तितके प्रयत्न करायचो
झाली का शांत? गेला का राग? हळूच तिला पाहायचो.
डोळ्यांत बघताच माझ्या, गालावर तिच्या कळी खुळायची,
'गप तू,बस शांत'..म्हणत मला प्रेमळ दमच द्यायची.
'नक्की वेळेत येईन' सांगून तासंतास गुंतून जायचो जायचो.
पुढच्या भेटीसाठी मात्र वेळेआधीच मी जाऊन थांबायचो.
पुन्हा नको रुसवा-अबोला म्हणून थोडी काळजी घ्यायचो.
पुन्हा नको रुसवा-अबोला म्हणून थोडी काळजी घ्यायचो.
Vj
:- स्व
२७ फेब्रुवारी, २०१९
कोल्हापूर.
Sunday, January 27, 2019
"....वेडा प्रयत्न सुरू आहे.."
"....वेडा प्रयत्न सुरू आहे.."
छंद तुला पाहण्याचा,
तुला जाणून घेण्याचा,
तुझ्या विश्वात रामण्याचा...
वेडा प्रयत्न सुरू आहे
तुझ्या वाटेवर थांबण्याचा,
गर्दीत तुला शोधण्याचा,
हाव-भाव तुझे वेचण्याचा...
वेडा प्रयत्न सुरू आहे
तुझी नजरा-नजर होण्याचा,
हळूच दुसरीकडे पाहण्याचा,
ओळखीत अनोळखी दाखवण्याचा...
वेडा प्रयत्न सुरू आहे.
तुलाच पाहत राहण्याचा,
नकळत हास्य लपवण्याचा,
तुझ्यात हरवून जाण्याचा...
वेडा प्रयत्न सुरू आहे.
Vj
:- स्व
26 जानेवारी 2019
पुणे
Sunday, October 21, 2018
भरारी मला घेऊ दे
तुझ्यासाठी सुचलेल्या ओळी
जेंव्हा तूच वाचतेस,
तेंव्हा मन खूप बिथरून जात
कारण प्रत्यक्षात तू समोर नसतेस।
वाचून त्या ओळी ज्या तुझ्याच आहेत
काय वाटलं असेल तुला ज्यात स्वतःच आहेस
राहिला असेल काय संपूर्ण प्रसंग तुझ्या समोर
की गेल्या असतील ते स्मरणीय क्षण गुदमरून।
खरच बिथरून जातो मी या अश्या प्रश्नांनी
ज्याची प्रश्नसुद्धा तूच आहेस आणि उत्तरे सुद्धा तूच
वाटत जे होत ते यावं पुन्हा नव्याने आयुष्यात
पण आता आहे त्यात का करावा असा अट्टाहास।
वाटत रे खूप पण आता वाटण्याला सुद्धा मर्यादा आहेत
घेऊन स्वप्ने नवी नाती, संकटांना तोंड देत जगायचं आहे।
जुन्यातच रमत बसलो तर वर्तमान काय म्हणेल?
फक्त विचारच करत बसलो तर भविष्यातही हाती काही नसेल.
तुझ्यासाठी सुचलेल्या ओळी जेंव्हा तूच वाचतेस,
तेंव्हा मन खूप बिथरून जात कारण प्रत्यक्षात तू समोर नसतेस।
दे पुन्हा साद मला तू पेटून आता उठू दे
तुझ्या शब्दांना सोबतीला घेऊन भरारी मला घेऊ दे।
तुझ्या शब्दांना सोबतीला घेऊन भरारी मला घेऊ दे।...vj
Subscribe to:
Posts (Atom)
काही तरी बोल ना
काही तरी बोल ना दिवसेंदिवस तुझा हा दुरावा कधी येऊन संपावशील? प्रेमाचे चार शब्द एकवूनी पुन्हा मला आपलंसं करशील तयारच आहेत कान माझे मन ही आतु...
-
देशाचं हित कुणाच्या हातात? मागील काही दिवसांपासून राज्यसह संपूर्ण देश लॉकडाऊन मध्ये आहे. कोविड १९ कोरोना या विषाणूनमुळे राज्य, देशच नव्हे तर...
-
वसुंधरेसाठी निसर्गाची सोडून साथ, त्यालाच आम्ही दम देतोय. करेल किती सहन तो ही, आपले अस्तित्व दाखवून देतोय.. Image Source : Facebook केली कत्त...
-
बड़ी मासूम सी थी जिंदगी सबकुछ नया नया सा था। वक्त वक्त की बात हैं, बड़ा हसीन बचपन था। गिरते संभलते रहते हर दिन मस्तीसे भरा आंगन था। गलतियां और...



