मनामध्ये वादळ आणून
काही क्षण मना मध्ये असं घर करून जातात कि त्या कधी कधी कवितांच्या स्वरूपात व्यक्त होतात. अशाच काही क्षणांचे आणि आठवणींचे कवितेतून मांडलेली सफर
Saturday, April 18, 2020
Sunday, April 12, 2020
देशाचं हित कुणाच्या हातात?
देशाचं हित कुणाच्या हातात?
मागील काही दिवसांपासून राज्यसह संपूर्ण देश लॉकडाऊन मध्ये आहे. कोविड १९ कोरोना या विषाणूनमुळे राज्य, देशच नव्हे तर संपूर्ण जग बंद पडलं आहे. चीनच्या वुहान मधून सर्वदूर पसरलेल्या या व्हायरस ने मोठ्या शहरांसोबत छोट्या छोट्या खेड्यांत देखील शिरकाव केला आहे. या विषाणूसाठी अजून लस उपलब्ध नसली तरी आपण काही नियम पाळून त्याला रोखू शकतो, पण नियम कुणासाठी??
वुहान जे की कोरोना व्हायरसचं केंद्रबिंदू होतं, तिथून हा व्हायरस गेला आणि ७६ दिवसांनी तेथील लॉकडाऊन हटवण्यात आलं. तेथील जनतेने पाळलेल्या कडक नियम आणि शिस्त यामुळेच ते यातून पार पडलेत. युरोपियन देश आणि अमेरिका सध्या ज्या स्थितीत आहेत त्या परिस्थिती पासून भारत लांब असला तरी काही लोकं नियम धाब्यावर बसवून गर्दी करताना दिसतच आहेत.
केंद्र सरकार आणि राज्य सरकारने प्रशासनाला सोबत घेऊन या विषाणू विरुद्ध लढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. डॉक्टर्स, पोलीस आणि अत्यावश्यक सेवा पुरवणारे सारेच आपल्या जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. पण सरकारने सांगितल्याप्रमाणे "सोशल डिस्टन्स" मात्र काही लोकं पाळताना दिसत नाहीत.
देश संकटात असताना देशाचे नागरिक या नात्याने आपले पण काही कर्तव्य आहेत ज्याला आपण तयार राहील पाहिजे, पण काही ना काही कारणं काढून लोकं गर्दी करतच आहेत. संचारबंदी असतानाही स्वतःला सुशिक्षित समजणारे देखील सकाळी मॉर्निंग वॉक ला जात आहेत, या मध्ये तरुणांच्या बरोबरीने या विषाणूच्या घातक पातळीवर असणाऱ्या वयोगटातील म्हणजेच वृद्ध व्यक्तिंचाही समावेश पाहायला मिळतो.
सुट्या मिळाल्या आहेत म्हणून घरी न थांबता काहीजण पार्ट्या करण्यात गुंग आहेत. ग्रुप करून पोहायला जाणे, काट्यावर जमून गप्पा मारणे, गावातून बिनकामाचा फेरफटका मारणे असे प्रकार देखील दिसत आहेत. देशसेवेसाठी कधीही तयार असं म्हणणारे मात्र प्रत्यक्षात उलट वागताना दिसत आहेत. त्यांचं देशप्रेम कमी आहे अशातला भाग नाही पण त्यांना या विषाणूंची भीतीच राहिलेली नाही. 'मला नाही होणार' असं त्यांना वाटतं असलं तरी 'माझ्यामुळे कोणाला व्हायला नको' ही भावना निर्माण होणं गरजेचं आहे.
काही ठिकाणी दोन तीन दिवस १००% लॉकडाऊन केल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी यात्रेप्रमाणे गर्दी होताना दिसत आहे. मुंबई सारख्या रेड झोन मध्ये असणाऱ्या ठिकाणी सुद्धा भाजीपाला, मासे घेण्यासाठी लोकांची गर्दी बघून परिस्थिती अजून किती भयानक होऊ शकते हे समजू शकते. धारावी सारख्या गर्दीच्या ठिकाणी या रोगाचे खूप रुग्ण आढळून येत आहेत. तसेच वरळी मध्ये देखील रुग्णांची संख्या जास्त आहे. पण तरी देखील मुंबई मधील गर्दी "स्पिरिट ऑफ मुंबई" च्या नावाखाली जमतच आहे. हे भयानक आहे. २०१९ ला कोल्हापूर, सांगली ,सातारा जिल्ह्यातील महापुरावेळी परिस्थिती खूप वाईट होती. त्यावेळी लाईट नव्हती, दूध, छोटे दवाखाने,भाजीपाला मार्केट सर्व बंद होतं. मोठ्या शहराचा संपर्क तुटला होता तरीही लोकांनी धीर सोडला नाही. सर्वजण प्रशासनाला साथ देत होते.
सर्व जबाबदारी प्रशासनावर आणि सरकारवर टाकून नाही चालणार, आपण देखील आपली जबाबदारी उचलायलाच हवी नाही तर आपली परिस्थितीसुद्धा युरोपीयन देशांसारखी व्हायला वेळ लागणार नाही. घरातील एखादी व्यक्ती अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर जात असेल तर त्याची योग्य ती खबरदारी त्या व्यक्तींबरोबरच घरच्यांनी देखील घ्यायला हवी. किराणा, भाजीपाला आणि औषध आणण्यासाठी घरातील एकाच व्यक्तीला पाठवाव आणि समान धुवुनच आत घ्यावं. घरातील एखादी व्यक्ती ऐकत नसेल तर त्यांना परिस्थिती नीट समजावून सांगा.
शासनाने सांगितलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे आणि जो कोणी करत नसेल त्यालाही नियमांचे पालन करण्यास सांगावे, काही लोकांच्यामुळे नियम पाळणाऱ्या व्यक्तींनाही याचा त्रास होऊ शकतो. येत्या काही दिवसांत कोरोनाला आपण हारवूच पण त्यासाठी आपला खारीचा वाटा असणं तितकंच महत्वाचं आहे. देशासाठी आणि आपल्या भविष्यासाठी घरीच थांबुया आणि देशसेवा करूया....
: - स्व,
१२ एप्रिल,२०२०
कोल्हापूर
Friday, April 10, 2020
वसुंधरेसाठी.....
वसुंधरेसाठी
निसर्गाची सोडून साथ,
त्यालाच आम्ही दम देतोय.
करेल किती सहन तो ही,
आपले अस्तित्व दाखवून देतोय..
Image Source : Facebook |
केली कत्तल बेसुमार या,
आम्हालाच पोसणाऱ्या झाडांची.
हवे नवे बंगले अन सुविधा,
हौस आम्हाला गाड्यांची..
मुजवून टाकू समुद्रसुद्धा
टाकुनी भर खडकांची,
वाटेल भीती त्यालासुद्धा
भल्या मोठ्या या दगडांची..
प्रदूषणावर बोलावे काय
त्याचीही आता हद्द झाली,
फुकट मिळणारी हवा आता
पैसे देऊन मिळू लागली..
माणसाला कधी समजणार
चूक त्याच्या स्वार्थाची,
समतोल सारा बिघडवू लागलो
बाजू घेऊन व्यर्थाची..
निसर्ग तरी बसेल का शांत
तोच त्याचे उत्तर देईल,
सहनशक्ती च्या उद्रेकावर
सर्वांनाच निसर्गात सामावून घेईल..
चला, आता पुढे येवुया
घेऊनी शपथ पृथ्वीची,
पापं फेडूनी करू तयारी
वसुंधरेला वाचवायची..
पापं फेडूनी करू तयारी
वसुंधरेला वाचवायची...Vj
:- स्व,
१० एप्रिल, २०२०
कोल्हापूर
Saturday, April 4, 2020
माणसातील माणूस शोधतोय
माणसातील माणूस शोधतोय
धकाधकीच्या जीवनातून या
कुटुंबात मी रमतोय,
आमच्यासाठी राबणाऱ्या त्या
माणसातील माणूस शोधतोय..
विषाणूंचा विळखा जगाला
मनुष्य गुदमरून मरतोय,
कधी नव्हे ते प्राणिमात्रा
स्वतंत्र आयुष्य जगतोय..
आम्ही केली पापं
तेच भोग भोगतोय,
देऊळ बंद झालीत तरी
डॉक्टरांमध्ये देव बघतोय..
दिवसरात्र बंद सारे
तरी निर्धास्त राहतोय,
यंत्रणासारी सज्ज करून
पोलिस रात्रंदिवस जागतोय..
थांबलं असलं जग
शेतकरी कुठं थांबतोय,
पोटं आपली भरण्यासाठी
तो उपाशीच राबतोय.
किती कौतुक करावे
अश्यांचे देशप्रेम अनुभवतोय,
जीवावर उधार होणाऱ्या त्या
माणसातील माणूस शोधतोय..
जीवावर उधार होणाऱ्या त्या
माणसातील माणूस शोधतोय...Vj
स्व.
०४ एप्रिल, २०२०
कोल्हापूर
Thursday, April 2, 2020
सोबतीचा हात
.
सोबत चालताना तुझ्या
मन हे फुलुन जाईल,
हात हातातले ते
तिरकी नजर पाहिल..
बोलावे किती अन
जाणून काय घ्यावे,
तुझं ऐकता ऐकता
तुझा होऊन पहावे..
न संपो कधी ही वाट
वाटेवरी चालताना,
गर्दीतल्या स्पर्शापेक्षा
नव्याने स्पर्श झेलताना..
तिमिरात ही पडावा
उजेड हा जीवांचा,
राहो अखंड ऐसें
हात हातात सोबतीचा..
राहो अखंड ऐसें
हात हातात सोबतीचा...Vj
:-स्व
०१ एप्रिल,२०२०
कोल्हापूर
Subscribe to:
Posts (Atom)
काही तरी बोल ना
काही तरी बोल ना दिवसेंदिवस तुझा हा दुरावा कधी येऊन संपावशील? प्रेमाचे चार शब्द एकवूनी पुन्हा मला आपलंसं करशील तयारच आहेत कान माझे मन ही आतु...
-
. सोबत चालताना तुझ्या मन हे फुलुन जाईल, हात हातातले ते तिरकी नजर पाहिल.. बोलावे किती अन जाणून काय घ्यावे, तुझं ऐकता ऐकता तुझा होऊन पहावे.. ...
-
काही तरी बोल ना दिवसेंदिवस तुझा हा दुरावा कधी येऊन संपावशील? प्रेमाचे चार शब्द एकवूनी पुन्हा मला आपलंसं करशील तयारच आहेत कान माझे मन ही आतु...
-
आज ते पुन्हा भेटले..., त्याच बोलणं ती ऐकत होती स्वतःला ती सावरत होती मनात चिंता खूप विचार पण सांगायला ती घाबरत होती त्याने ओ...